नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI Airport) उडवण्याची धमकी दहशतवादी संघटना अलकायदाने दिली आहे. दिल्ली पोलिसांना शनिवारी सायंकाळी अलकायदाच्या नावे ईमेल आला होता. यात येत्या काही दिवसात आयजीआय एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी मिळताच दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून, दिल्ली विमानतळावरही सुरक्षा वाढवली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, दिल्ली पोलिसांना शनिवारी एक ईमेल आला होता. ज्यात म्हटले की करणबीर सूरी उर्फ मोहम्मद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारा उर्फ हसीना रविवारी सिंगापूरवरुन भारतात येत आहेत. ते दोघे आयजीआय एअरपोर्टवर येत्या काही दिवसात बॉम्ब ठेवणार आहेत.
ईमेलच्या तपासानंतर डीआयजींनी सांगितले की, यापूर्वीही याच नावाने अशाच स्वरुपाची धमकी मिळाली होती. याला बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी (BTAC) ने विशिष्ट नसल्याचे घोषित केले. तरीदेखील दिल्ली एअरपोर्टच्या सिक्योरिटी ऑपरेशंस कंट्रोल सेंटर (SOCC) ने सर्व सुरक्षा यंत्रणांना याची माहती देऊन अलर्ट जारी केला आहे.