नवी दिल्ली : भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ऑलिम्पिक ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकून 121 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. त्याने शनिवारी खेळलेल्या अंतिम सामन्यात 87.58 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले.
नीरजच्या या विजयाने संपूर्ण देश जल्लोषात मग्न आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. खुद्द पंतप्रधान त्याच्याशी फोनवर बोलले. गृहमंत्री अमित शहा, लष्करप्रमुख आणि राहुल गांधी, सोनिया गांधी यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे.
नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. विजयाच्या 3 तासांच्या आत, नीरजला 13.75 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. यामध्ये राज्य सरकारांपासून ते रेल्वे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना, याच्या वतीने नीरजला रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
हरियाणा सरकार क्लास-वन जॉब आणि अनुदानित जमीन देईल. हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नीरजला 6 कोटी रुपये रोख आणि क्लास-वन नोकरी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर याची घोषणा करताना म्हणाले की, आम्ही पंचकुलामध्ये खेळाडूंसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स बांधू. नीरजला हवे असल्यास, आम्ही त्याला तेथे प्रमुख बनवू. हरियाणा सरकार नीरजला 50% सवलतीसह भूखंड देईल.
बीसीसीआय नीरजला एक कोटी रुपये, उर्वरित पदक विजेत्यांना बक्षीस रक्कम देईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. बीसीसीआयने रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानू आणि रवीकुमार दहिया यांना 50 लाख आणि कांस्यपदक विजेते पीव्ही सिंधू, लवलिना बोरगोहेन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यासह, क्रिकेट मंडळ हॉकी पुरुष संघाला 1.25 कोटी रुपये देखील देईल.
पंजाब सरकार 2 कोटी, मणिपूर सरकार 1 कोटी देईल
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय लष्करात सेवा करणाऱ्या नीरज चोप्राला 2 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. कॅप्टन म्हणाले की, एक सैनिक म्हणून नीरजने देशाला अभिमानीत केले आहे. त्याचे यश ऐतिहासिक आहे. यासोबतच मणिपूर सरकारने नीरजला एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.