पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कोयत्याने वार करून तीचा खुन केल्याप्रकरणी पतीस हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुल गोकुळ प्रतापे (वय ३०, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे मुळ गाव घारगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गौरी प्रतापे (वय २१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नवनाथ बोरगे (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतापे हा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो. तो पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये भांडणे होत. दरम्यान, मंगळवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी आरोपी राहुल ने पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत तीला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या तावडीतून सुटून गौरी घराबाहेर पळाली मात्र, रस्त्यावर राहुल याने पत्नीवर कोयत्याने वार करून तीचा खून केला.
खुनाचा गुन्हा गंभिर स्वरूपाचा आहे. गुन्ह्यातील कोयता जप्त करणे, कोणत्या कारणावरून संशय घेत होता याचा तपास करणे, नातेवाईक आणि साक्षीदाराकडे तपास करण्यासाठी आरोपी राहुल याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिल विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. पोलिस निरिक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.