भ्रष्टाचार करुन तुंबड्या भरणे हा एकमेव कार्यक्रम सत्ताधारी भाजपचा : श्रीरंग बारणे

0
पिंपरी :  ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले आहे. भ्रष्टाचार करुन तुंबड्या भरणे हा एकमेव कार्यक्रम राबविणाऱ्या टोळीने भाजपला नाकीनऊ आणले. महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे भाजपचे मूळ, जुने कार्यकर्ते, नेत्यांना अति व दु:ख, वेतना होत आहेत मात्र ते हतबल आहेत, असा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.
महापालिका स्थायी समिती अध्यक्षांना एसीबीने अटक केली असून पालिकेतील भ्रष्टाचार उघड झाला आहे. भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेने शुक्रवारी (दि.२०) आंदोलन केले. त्यानंतर खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारात लक्ष घालावे. भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनंत को-हाळे, धनंजय आल्हाट, योगेश बाबर आणि अन्य या वेळी उपस्थित होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठविले आहे.
खासदार बारणे म्हणाले, महापालिकेत सत्तेच्या जोरावर भ्रष्टाचार चालला आहे. भ्रष्टाचाराचा नंगानाच चालविला आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण शहरातील भाजप नेत्यांचे राहिले आहे. भाजपने शहरवासीयांची लूट केली. ही लुटारुंची टोळी आहे. कोरोना काळातही भ्रष्टाचार करणे सोडले नाही. मागील साडेचार वर्षांत भाजपने भ्रष्टाचाराचा कळस केला. ना भय ना भ्रष्टाचार ही घोषणाच भ्रष्टाचाराच्या खाईत लोटली. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड होत आहेत.
स्मार्ट सिटी, कचरा संकलन, अमृत योजना, विविध निविदा प्रक्रियेत रिंग होत आहे. पंतप्रधान आवास योजना कामात झालेला भ्रष्टाचार, कचरा निविदेतील रिंग व त्यातून झालेला भ्रष्टाचार, शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामात झालेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत विविध कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार अशी भ्रष्टाचाराची जंत्रीच आहे.  बुधवारी (दि.18) तर वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचा-यांना आणि समिती अध्यक्षना एसीबीने  रंगेहाथ पकडले. यामुळे महापालिकेची राज्यभर बदनामी झाली आहे.
महापालिका अधिकारी, नगरसेवक, सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी हे स्वतःच ठेकेदाराच्या नावावर टेंडर घेत आहेत. महापालिकेला लुटत आहेत. ही बाब गंभीर आहे. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच एसीबीने पालिकेत येऊन लाच प्रकरणी लोकप्रतिनिधीला अटक केली. महापालिकेत राजरोसपणे चाललेल्या भ्रष्टाचाराचा हा मोठा पुरावा आहे. याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
Leave A Reply

Your email address will not be published.