पुणे : पुण्यासह अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी चो-या करणा-या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीवर चोरीचे १५ हून अधिक गुन्हे दाखल आहे. टोळीवर नुकतीच मोक्कानुसार कारवार्इ करण्यात आली आहे.
बाळू उर्फ बाळ्या झा-या भोसले (रा. निघोज, पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या सदस्याचे नाव आहे. विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी त्याला सात दिवसांची मोक्का कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात यापुर्वी विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय २६) आणि दिपक उर्फ आशिक आझाद काळे (वय २५ दोघेही रा. रा. पारनेर) यांना अटक करण्यात आली आहे. तर पंकज उर्फ पंक्या नरेश काळे, राहुल अर्पण भोसले, शहाद्या उर्फ सादीश जाकीट काळे आणि गणेश सुरेश भासले (सर्व रा. पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत सागर सुरेश खराडे (वय ३०, रा. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
१२ डिसेंबर २०२० रोजी रात्री फिर्यादी दे त्यांच्या घरात झोपलेले असताना आरोपींनी त्यांच्या घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर फिर्यादी यांचे आर्इ-वडील झोपलेल्या घराचा कडी कोयंडा तोडून आत घूसत रोख रक्कम आणि दागिणे असा एक लाख २५ हजार रुपयांचा एवज चोरला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना आळेफाटा पोलिसांनी बाळू भोसले याला अटक केली आहे.
या गुन्ह्यातील इतर आरोपींसह टोळी प्रमुख अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. आरोपींनी चोरीच्या रकमेतून काही संपत्ती घेतली आहे का?, त्यासह गुन्ह्याच्या पुढील तपापासाठी भोसले याला मोक्का कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने भोसले याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.