राज्यात रात्रीची संचारबंदी लागण्याची शक्यता

0

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने गुरुवारी केली होती. त्याबाबत आता राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

“राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करेल,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे, त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला सांगितले होते. तसेच, करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले होते.

देशातील ४१ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर असून, करोनाची दुसरी लाट अजूनही कायम आहे. करोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली होती. केरळ व महाराष्ट्राने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुलनेत अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निदर्शनास आणून दिले होते.

दरम्यान, केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ कायम दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ३१ हजार २६५ करोनाबाधित एकट्या केरळ राज्यातील आहेत. तसेच १५३ राज्यात १५३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.