पिंपरी : औद्योगिकनगरी, राहण्यासाठी योग्य शहर असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराची ओळख आणखी एका प्रकल्पामुळे वाढणार आहे. कारण शहरात जागतिक दर्जाची भव्यदिव्य ‘ भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी’ उभारली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 8 एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे तर उर्वरित 7 एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी 191 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
एकविसाव्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणे, हे परिवर्तन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, या अनुषंगिक जिज्ञासा निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा सामाजिक विकासासाठी उपयोग करणे, आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकवणे, अनुभवात्मक शिक्षण, विज्ञानावर आधारित विविध संकल्पनांचे सादरीकरण, प्रदर्शन आदी बाबी विचारात घेऊन त्याची माहिती आणि ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीची स्थापना करण्यात येणार आहे.