मित्राचा हत्याराने गळा चिरून निर्घृणपणे खून

0

पिंपरी : एकाच खोलीत राहणाऱ्या मित्राचा दुसऱ्या मित्राने हत्याराने गळा चिरून निर्घृणपणे खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरातील वराळे फाटा येथे घडली.

अशोककुमार (35, रा. वराळे फाटा, ता. मावळ. मूळ रा. कर्नाटक) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. आविष्कार नवनाथ चौगुले (20, रा. वराळे फाटा, मावळ. मूळ रा. कर्नाटक) यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंगाली (25, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजकुमार मोहनलाल मंगलानी, मयत अशोककुमार आणि आरोपी बंगाली हे वराळे फाटा येथे एकत्र राहतात. त्यांच्या शेजारी भाड्याने फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह राहतात. सर्वजण केटरर्सकडे तसेच बिगारी काम करून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी सकाळी फिर्यादी हिंजवडी येथे बिगारी कामासाठी गेले. रात्री सात वाजताच्या सुमारास ते परत आले.

त्यावेळी फिर्यादी यांना मनोजकुमार मंगलानी यांच्या खोलीतून एखाद्याला मारण्याचा आवाज आला. परंतु  यांचे मित्र दारू पितात आणि त्यांच्यात अधूनमधून बाचाबाची होते या कारणावरून फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने त्या खोलीतून बंगाली हा घाईघाईने काळी बॅग घेऊन बाहेर पडला.

बंगाली हा रस्ता नसलेल्या ठिकाणाहून जात असल्याने फिर्यादी यांनी त्याला रस्ता दाखवला. त्यांनतर बंगाली घाबरलेल्या अवस्थेत कामाला जात असल्याचे सांगून निघून गेला. रात्री अकरा वाजताच्या सुमारास मनोजकुमार आणि त्यांचे मित्र घरी आले. त्यांनी खोली उघडून पाहिले असता अशोककुमार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. अशोककुमार याचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केल्याचे उघडकीस आले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.