ठाकरे सरकारने करुन दाखवले; वाचा सविस्तर…

0

मुंबई : मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या वेगवेगळ्या पदांवरील जवळपास ३०० अधिकाऱ्यांची बदल्यांचा हंगामाची संधी साधत दुसरीकडे बदली करण्यात आली आहे. एकाच जागी अनेक वर्षे बसल्याने सचिवांपेक्षाही अधिक ताकदवान बनलेल्या या अधिकाऱ्यांची बदली करणे देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही सरकारना जमले नव्हते. मात्र ते काम ठाकरे सरकारने करून दाखविल्याची चर्चा मंत्रालयात ऐकायला मिळत आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने या बदल्या झाल्या आहेत. मंत्रालयात काम करणारे आणि विशेषत मंत्रालय केडरमधील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून बसतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संधान साधून तसेच मंत्रालयात बरीच वर्षे काम केल्याच्या अनुभवावर हे अधिकारी कोणी त्यांची बदली करायचा प्रयत्न केला तरी प्रसंगी वाटेल तो दबाव आणून त्यांच्या बदल्यांचा प्रयत्न हाणून पाडतात. साहजिकच हे अधिकारी एकाच जागेवर राहून एखाद्या खात्याचा सचिवच नव्हे तर कॅबिनेट मंत्र्यापेक्षाही सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली बनतात.

मागच्या काळातील देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्येही या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रयत्न झाले होते. मात्र त्यात त्यांना फारसे यश आल्याचे दिसले नव्हते. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत सल्लामसलत करून मंत्रालयातील या ३०० अधिकाऱ्यांची बदल्याच्या हंगामाची संधी साधत बदली केली आहे. या कामासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाची मदत केल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.