IPS अधिकाऱ्यांना कधी, केव्हा, कशी पावलं टाकायची हे त्यांना बरोबर माहीत असत
असे का म्हणाले शरद पवार; वाचा सविस्तर
पुणे : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक आरोप केला आहे. राज्यातील IPS अधिकारी मुंबई व दिल्लीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. त्यानंतरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना ED आणि CBI मार्फत लक्ष्य केलं जातं, असं ते म्हणाले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार हे आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना भेटण्यात गैर काही नाही. मात्र अधिकाराचा गैरवापर होता कामा नये,’ असं शरद पवार म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, ‘मी अनेक वर्षे सत्तेत होतो, अनेक वर्षे विरोधी पक्षात होतो. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा सगळे अधिकारी मलाही भेटत होते. मी एखादी सूचना केली आणि ती योग्य असेल तर त्याला नाही म्हणायचे नाहीत. असं ते म्हणाले.
लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणं यात गैर काही नाही. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर ते अयोग्य आहे. त्यामुळं माजी मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना भेटत असतील, उद्या पृथ्वीराज चव्हाणही अधिकाऱ्यांना भेटले तर यात काही चिंता करण्याचं कारण नाही. अधिकारी हे सर्वांना व्यवस्थित ओळखत असतात. कधी, केव्हा, कशी पावलं टाकायची हे त्यांना बरोबर माहीत असतं, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.