अखेर रावेत पोलीस ठाण्यास राज्य शासनाची मान्यता

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील देहूरोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रावेत पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. पोलीस ठाण्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर अन्य साहित्यासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे.

पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाचा भाग वर्ग करुन स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मजूर झाले आणि त्याची प्रत्यक्षात सुरुवात झाली. शहराला आणि आयुक्तालयास पहिले आयुक्त म्हणून आर.के. पद्मनाभन यांची नियुक्ती झाली. भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पद्मनाभन यांनी बावधन पोलीस चौकी, रावेत पोलीस चौकी, शिरगाव पोलीस चौकी, म्हाळुंगे पोलीस चौकी आणि पाइट पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस ठाण्यात करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला, गृहविभागाला दिला होता. पैकी रावेत पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करून रावेत पोलीस चौकीचे रूपांतर नवीन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले आहे. रावेत पोलीस चौकीसाठी एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 9 पोलीस हवालदार, 18 पोलीस नाईक, 36 पोलीस शिपाई अशा 71 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

सध्या रावेत पोलीस चौकीमध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चार पोलीस हवालदार, चार पोलीस नाईक, 19 पोलीस शिपाई असे 31 पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या रावेत पोलीस  स्टेशनसाठी एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पाच पोलीस हवालदार, 14 पोलीस नाईक, 17 पोलीस शिपाई अशी 40 पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नवनिर्मित रावेत पोलीस स्टेशनसाठी 15 लाख 54 हजार पाचशे रुपये इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.