पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नाम फलकावर ‘शाई फेकली’
भाजपा नगरसेविका आशा शेडगे यांच्यासह १० जण पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नाम फलकावर भाजपा नगरसेविका आशा शेडगे यांनी शाई फेकली असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. याप्रकरणी १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा शेडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यालय बाहेर असलेल्या नामफलकावर शाई फेकत निषेध व्यक्त केला. याप्रकरणी शेडगे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
आशा शेडगे या कासारवाडी दापोडी प्रभागाच्या नगरसेविका आहेत.
प्रभागात सुरू असलेल्या रस्ते खोदाई प्रकरणीसह काही समस्यांबाबत त्या महिला कार्यकर्त्यांसमवेत आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्याकरिता आल्या होत्या. मात्र आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा महत्वाची बैठक सुरू असल्यामुळे त्या आयुक्तांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या आशा शेडगे यांनी आयुक्तांच्या कार्यालय बाहेर असलेल्या नाम फलकावर शाई फेक करत निषेध व्यक्त केला.
हा प्रकार घडतात काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी आशा शेंडगे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना महापालिकेच्या आवारातून ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महापालिकेत एकच गोंधळ उडाला.