धक्कादायक… ‘त्या’ 14 वर्षीय मुलीवरील सामुहिक अत्याचाराचे केले होते ‘रेकॉर्डिंग’

0

पुणे : अपहरण करून सामुहिक अत्याचार प्रकरणात  पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. त्यांनी देखील अत्याचार केल्याचे तपासात पुढे आले आहे. या गुन्ह्यात आता प्रयत्न 19 जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या सर्व प्रकारचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे. चित्रीकरण नेमके कोणी केले व आता हे कोठे आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण 19 जणांना अटक केली आहे. त्यातील दोघेजण हॉटेल व्यवसायिक आहे. एक संबंधित मुलीचा मित्र तर उर्वरित 16 जण हे अत्याचार करणारे संशयित आरोपी आहेत.

मेहबूब बादशहा शेख (27, रा. सुरक्षानगर, वैदवाडी, हडपसर) आणि इस्माईल लतीफ शेख (36, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशोक कल्याण चव्हाण (32, रा. शिवाजीनगर) आणि राजेश विठ्ठलराव मिसाळ (41, रा. साठे वस्ती लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोन लॉजच्या व्यवस्थापकांची नावे आहेत. यातील चव्हाण याने लॉजच्या रजिस्टरमध्ये नोंद न करताच मुलगी आणि आरोपीला खोली भाड्याने दिली. तर मिसाळ याने लॉजच्या रजिस्टरमध्ये पीडित मुलीचे चुकीचे नाव व वय नोंदवले. या दोघांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात हलगर्जी केल्याने तसेच आरोपीला गुन्हा करण्यात प्रोत्साहन आणि अपप्रेरणा दिल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या 14 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. त्यामुळे सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. नव्याने अटक करण्यात आलेले आरोपी तसेच यापूर्वी अटकेत असलेले आरोपी यांच्याकडे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने यापूर्वी अटक 14 आरोपींच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

दरम्यान संबंधित मुलगी पुणे स्टेशनवरून रेल्वेने दादर येथे उतरल्यानंतर ठाण्यातील एका 32 वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचे काल उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपीस वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. राजेश शांताराम कुंभार (32, रा. शांताबाई चाळ, कोपरी, ठाणे पूर्व ) असे अटक आरोपीचे नाव आहे. वानवडी पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी या गुन्ह्याचा तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.