पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, आज झालेल्या कोरोना आढवा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या रविवारी (दि.19) गणेश विसर्जन असल्याने पुणे शहर आणि पिंपरी शहर तसेच तिन्ही कॅन्टोंमेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्याबाबतचे सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, त्याबाबचा आदेश काही वेळानंतर विभागीय आयुक्त काढणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी बाजारपेठेत आणि रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कोरोना आढावा बैठकीला सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते.सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी (दि. 19) पुणे, पिंपरी, खडकी कॅन्टोंमेंट, पुणे कॅन्टोंमेंट आणि देहूरोड कॅन्टोंमेंटमधील सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. मात्र, सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मेडिकलची दुकाने आणि दवाखाने उघडी राहणार आहेत. त्याच बरोबर सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट देखील रविवारी उघडी राहणार असल्याची माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.