नवी दिल्ली : शेअर बाजारात बुधवारी (२९ सप्टेंबर) मंदी दिसून आली. मात्र, दुसरीकडे टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढटाटा पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ नोंदवली गेली. टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या शेअर्सने बुधवारी बाजारात ३.३८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सकाळी दहा वाजता टाटा पॉवरचा शेअर १४५ रुपयांच्या जवळ पोहोचला होता. बुधवारच्या व्यापारात टाटा पॉवरच्या शेअर्समध्येही १३८.८० रुपयांपर्यंतची निच्चांकी पातळीही दिसून आली होती.
जागतिक बाजारात प्रचंड विक्री आणि एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये झालेल्या नुकसानामुळे सेन्सेक्स बुधवारी सुरुवातीलाच ५०० अंकांनी घसरला. सेन्सेक्स ५०१.७४ अंक किंवा ०.८४ टक्क्यांनी घसरत ५९,१६५.८६ वर व्यवहार करत होता. दुसरीकडे, निफ्टी १३५.०५ अंक म्हणजे ०.७६ टक्क्यांनी घसरत १७,६१३.५५ वर बंद झाला.
टाटा पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांचा उच्चांक १४५.४० रुपये आहे. टाटा पॉवर शेअर्सची ५२ आठवड्यांची एक्झिट लेव्हल ५१.६५ रुपये आहे. इक्विटीवरील परताव्याबद्दल बोलायचं झालं, तर टाटा पॉवरचे शेअर्स सध्या ५.४१ टक्के परतावा देत आहेत. बुधवारच्या व्यवहारात टाटा पॉवरच्या १७ लाखांहून अधिक शेअर्सची विक्री झाली. जर स्टॉकच्या बीटा मूल्याबद्दल बोलायचं झालं, तर ते १.७३ वर आहेत. कोणत्याही स्टॉकचे बीटा मूल्य हे त्याच्या शेअर्सचे चढ-उतार दर्शवते. गेल्या एका वर्षात बीएसई सेन्सेक्स सुमारे ५३ टक्क्यांनी वधारला आहे, तर टाटा पॉवरचे शेअर्स १६८ टक्क्यांनी वाढले आहेत.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते होते आणि त्यांनी मंगळवारी १,९५७.७० कोटी रुपयांचे समभाग विकले, असे शेअर बाजारातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आशियातील इतर प्रमुख स्टॉक एक्स्चेंजमध्ये शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि सेऊल या शेअर बाजारांना मध्य-सत्रातील सौद्यांमध्ये प्रचंड तोटा झाला. या दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड १.५१ टक्क्यांनी घसरून ७७.१७ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.