पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मावळमधील एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते’ असे विधान केले होते. मावळातील या विधानानंतर राजकीय वर्तुळात या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटच्या माध्यमातून पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपमध्ये गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं आहे. भाजपमुळे चौकशी नाही आणि महत्त्वाचं म्हणजे इंदापुरच्या जनेतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही.
त्यामुळे आता निवांत झोप लागणार, असा टोला त्यांनी लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांना पक्षांतर करावं लागलं होतं. हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. तर मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठावर बसलेल्या एका नेत्यांना त्यांनी खासगीत याबाबत विचारले.
आपल्या भाषणात हा किस्सा सांगताना ते म्हणाले, आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारु नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा. पण आता भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.