पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या दोन्ही आमदारांनी (चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे) शहराची वाटणी केली आहे, अशी टीका शनिवारी (ता.१६) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कुणाचेही नाव न घेता केली होती. त्यावर दोन्ही आमदारांनी सावध व संयमी भूमिका घेतली आहे. आमदार महेश लांडगे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यासारखी प्रतिक्रिया दिली. तर, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पवारांची टीकेची बातमी वाचून उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पवारसाहेब हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही,असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. मात्र, शहराच्या विकासावर कुणाला शंका असेल, त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना पवार यांनी भाजपा, त्यांचे केंद्रातील सरकार, राज्यातील नेते तसेच पंकजा मुंडे आणि शहरातील दोन्ही आमदारांवर शनिवारी हल्लाबोल केला होता. राज्य सरकार पडणार या भूमिकेतून बाहेर पडा, असा घरचा आहेर मुंडे यांनी दसरा मेळाव्यात दिला होता. त्याबाबत विचारणा केली असता त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत, असे सांगून त्या प्रश्नाला पवार यांनी बगल दिली होती.
दरम्यान, मुंडे यांनी आपल्यावरील पवारांच्या टीकेवर लगेचच मुंबईत पलटवार केला. शरद पवार माझ्यापेक्षा मोठे आहेतच. यात वाद नाही. पण, त्यांच्या बोलण्याने मी लहान होत नाही वा मोठीही होणार नाही, असा टोला मुंडे यांनी लगेच लगावला होता. तशीच काहीशी प्रतिक्रिया आमदार लांडगे यांनीही त्यांच्यावर पवारांनी केलेल्या टीकेवर दिली.
‘‘शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही’’, असे आमदार लांडगे म्हणाले की, भाजपच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघे शहर विकासासाठी कटिबद्ध आहोत. माननीय शरद पवारसाहेबांच्या टीकेला उत्तर देण्य़ाइतका मी मोठा नाही. पण, भाजपच्या कार्यकाळाआधी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहराचा जेवढा विकास झाला नाही, तेवढा आम्ही दोघांनी मिळून गेल्या साडेचार वर्षात करून दाखवला आहे. त्याबाबत कोणाच्या मनात शंका असेल, तर त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी, त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही आमदार लांडगे म्हणाले आहेत.