सेक्स रॅकेट चालविणारा, ड्रग्ज माफिया काशिफ खान ला का सोडले ?
ड्रग्ज माफियाशी भाजपच्या नेत्यांचे संबंध : नवाब मलिक
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज शुक्रवारी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. क्रूझ ड्रग्ज पार्टीमधून सोडून दिलेला तो सेक्स रॅकेट चालविणारा मोठा ड्रग्ज माफिया काशिफ खान असल्याचे मलिक यांनी सांगितले. तसेच त्याचे आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्याला पकडले नाही, असा आरोप मलिकांनी केला आहे.
क्रूझवर पार्टीचे आयोजन करणारा काशीफ खान याला अटक केल्यानंतर सर्वकाही बाहेर येईल. त्याचे व वानखेडे यांचे संबंध आहेत, असा आरोप मलिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. काशिफ खान हा सेक्स रॅकेट तसेच ड्रग्ज माफिया असल्याचा पुनर्रचार मलिक यांनी केला आहे. पार्टीवेळी काशिफ खान क्रूझवर आपल्या मैत्रिणीसह उपस्थित होता. पण त्यानंतरही त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनात मलिक टाकणार भाजप नेत्यांवर बॉम्ब
मलिकांच्या या आरोपांना वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. हे आरोप खोटे असून त्यावर मी बोलणार नाही, असं वानखेडे म्हणाले आहेत. आता कायदा आपलं काम करेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, फ्लेचर पटले फ्रॉड आहे. त्याचे संबंध समीर वानखेडे यांच्याशी 11-12 वर्षांपासून आहेत. पटेलसोबत आदीर उस्मानी हाही व्यक्ती आहे. तो आयात-निर्यातीचे काम करतो. उस्मानीही अनेक प्रकरणांमध्ये एनसीबीचा साक्षीदार आहे. त्याचीही वानखेडे यांच्याशी आधीपासूनच ओळख असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन वादळी होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणामध्ये भाजप नेत्यांचाही थेट हात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विस्फोटक माहिती सादर करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मलिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी भाजप नेत्यांनाही सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझ्यावर टीका केली जाईल. आरोप केले जातील. पण मीही त्यांना उत्तर देणार आहे. त्यासाठी माहिती गोळा करत आहे. माझ्याकडे काही नेत्यांविषयी विस्फोटक माहिती आहे. या माहितीनंतर काही भाजप नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं टीकास्त्र मलिक यांनी सोडलं.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी आणि भाजपच्या एका नेत्याची पार्टनशीप आहे. एका खासगी कंपनीत त्यांची पत्नी व गोसावी संचालक असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. या नेत्याचं नावही अधिवेशनात उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणाशी काही भाजप नेत्यांचा संबंध असल्याचा थेट आरोपही मलिक यांनी केला आहे.