‘बँक ऑफ महाराष्ट्र’वर दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

२ कोटी १९ लाख किंमतीचे सोने व १८ लाख रुपयांची रोकड जप्त

0

पुणे : पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. भरदिवसा बँक ऑफ महाराष्ट्रच्या पिंपरखेड शाखेत दरोडा टाकणाऱ्या 5 दरोडेखोरांना अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले.
त्यांच्याकडून तब्बल २ कोटी १९ लाख किंमतीचे सोने व १८ लाख रुपयांची रोकड पोलीसांनी जप्त केली आहे

शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमधील घटनेच्या तपासबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रवीण उर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ (२९, रा. वाळत. ता. खेड), अंकुर महादेव पाबळे (२४, रा. कावळपिंपरी, ता. जुन्नर), विकास सुरेश गुंजाळ (२०, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर), आदिनाथ मच्छींद्र पठारे (२५, रा. पठारवस्ती) व धोडींभाऊ उर्फ धोंडा महादू जाधव (२९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गेल्या आठवड्यात (दि. २१) शस्त्रधारी दरोडेखोरांनी भरदिवसा बँकेत घुसत पिस्तूलाच्या धाकाने दरोडा टाकला होता. कॅशिअरला मारहाण करत बँकेतून ३२ लाख ५२ हजार रुपयांची रोकड आणि २ कोटी ४७ लाख २० हजार रुपयांचे सोन्या-चांदिचे दागिने चोरून नेले होते. आरोपींचा माग काढत प्रवीण उर्फ डॉलर याला अहमदनगर येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून इतर आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्यापैकी २ कोटी १९ लाख १५ हजार रुपयांचे ७ किलो ३२ ग्रॅमचे दागिने व १८ लाख २७ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक निरीक्षक सचिन काळे, संदिप येळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.