कॉल रेकॉर्डिंग प्रकरणात एकाला अटक

0

ठाणे : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला कॉल रेकॉर्डिंग प्रकरणातील फरारी आरोपी सागर जगताप याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ठाण्यातून ताब्यात घेत अटक केली आहे. शनिवारी (ता. ३१ ऑक्टोबर) ही कारवाई केली आहे.

कोणतीही परवानगी न घेता रश्मी शुक्ला ह्या फोन टॅप करत होत्या. महाराष्ट्रात सरकार बनविण्याचे संकट असताना त्यांनी सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केले आहेत, असा आरोप शुक्ला यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान ठाण्यातील वसंत विहार परिसरातील जस्मीन टॉवर बी विंगच्या २२ व्या मजल्यावर सागर जगताप वास्तव्यास होता. पोलिसांच्या कथित बदल्यांच्या प्रकरणात सागर जगताप याचा आधी जबाब नाेंदविण्यात आलेला होता. पुन्हा जबाबासाठी त्याला बोलावण्यात आले असता सागर जगताप हा फरारी झाला होता. त्यामुळे सीबीआयने शनिवारी (ता. ३१ ऑक्टोबर) रात्री उशिरा ठाणे शहर गाठत त्याच्या घरावर छापा टाकला होता. त्याच्याकडून सहकार्य न मिळाल्याने पथकाने त्याच्या घराचा दरवाजा तोडून त्याला अटक केली आहे, त्यामुळे रश्मी शुक्ला कॉल रेकॉर्डिंग प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येणार आहे.

‘‘वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी काम करणारे एक रॅकेट मंत्र्यांचे नाव वापरते आहे. बदल्यांबाबत पोलिसांबरोबर थेट बोलणे होत आहे, अशी माहिती शुक्ला यांना मिळाली होती. कॅाल रेकॅार्डिंग सुरु झाले त्यावेळी स्फोटक माहिती समोर आली. या साऱ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल शुक्ला यांनी २५ अॅागस्ट २०२० रोजी महासंचालकांना दिला,” असा आरोप विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगेच पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पलटवार केला होता, गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री थेट कोणत्याही बदल्या करत नाहीत. त्यासाठी स्वतंत्र मंडळ असते, त्यामुळे फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. शुक्ला यांच्या अहवालात आरोप करण्यात आलेल्या ८० टक्के बदल्या झाल्या नाहीत. शुक्ला यांनी खोटा अहवाल तयार केला. कोणतीही परवानगी न घेता त्या ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या. भाजपच्या एजंट म्हणून काम करताना त्यांना फोन टॅपिंगची सवय झाली होती, असा गंभीर आरोपही मलिक यांनी त्यावेळी केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.