समीर वानखेडें यांनी हजारो कोटी रुपये उकळले

नवाब मलिक यांचा मोठा आरोप

0

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. “समीर वानखेडे मुंबई एनसीबीत आल्यानंतर त्यांनी १५/२०२० हा गुन्हा दाखल केला. त्यात सारा अली, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला हजर केलं आणि १४ महिने झाले तरी यात आरोपपत्रही दाखल नाही. मागील १४ महिने या प्रकरणात हजारो कोटी रुपये वसुलण्यात आलेत,” असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले, “समीर वानखेडे आल्यानंतर एनसीबीने एक गुन्हा दाखल केला. त्यात सारा अली खानला हजर करण्यात आलं, त्याच प्रकरणात श्रद्ध कपूरला बोलावण्यात आलं, त्याच प्रकरणात दीपिका पदुकोनला बोलावण्यात आलं. संपूर्ण बॉलिवूडला या प्रकरणात बोलावण्यात आलं, आजपर्यंत ना ते प्रकरण संपलं, ना आरोपपत्र. असं काय आहे की १४ महिने हे प्रकरण बंदच होत नाहीये.”

“या प्रकरणात हजारो कोटी रुपये वसुलण्यात आले. ही वसुली मालदीवला झालीय. आम्ही २ फोटो दाखवले, एक दुबईचा आणि एक मालदीवचा. हे म्हणतात मी कधीच दुबईला गेलो नव्हतो, पण त्यांची बहिण दुबईला गेली होती. ते स्वतः मालदीवमध्ये होते. मालदीवचा दौरा सोपा नसतो. एवढे लोक गेले तर २०-३० लाख रुपयांचा खर्च येतो. याचा तपास झाला पाहिजे. यांचा खर्च कोणत्या खात्यातून झाला हे एनसीबीच्या सतर्कता विभागानं शोधावं,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

नवाब मलिक म्हणाले, “कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं.”

“मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल. या सर्व काळात त्यांनी जशाप्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे. कोणता अधिकारी एवढ्या महागाचे कपडे घालतो? एकदा घातलेले कपडे पुन्हा घालत नाही. दररोज २ लाखांचे बुट घालतो इतका प्रामाणिक अधिकारी असू शकत नाही. समीर वानखेडेने हजारो कोटी रुपयांची वसुली केलीय यावर मी ठाम आहे,” असे आरोप नवाब मलिकांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.