मृतदेहाचे तुकडे करुन दारूच्या भट्टीत दोन दिवस जाळले

अपहरणाच्या 12 दिवसानंतर गुन्ह्याचा उलगडा

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अत्यंत क्रूरपणे एकाचा खून करण्यात आलेला आहे. अनैतिकसंबंधाच्या रागातून तरुणाला मारहाण करुन त्याचे अपहरण केले. त्याचा खून करुन मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे दारूच्या भट्टीत दोन दिवस जाळले. पोलिसांना तपासात चक्रावण्यासाठी दृश्यम चित्रपटाप्रमाणे चक्क एका शेळीला कापून खड्यात पुरले. मात्र हिंजवडी पोलिसांनी तपास करुन हा सगळा प्रकार समोर आणला आणि यातील तीन आरोपींना अटक केलं आणि एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

लंकेश सदाशीव रजपुत ऊर्फ लंक्या (28, रा. बावधान बु. पुणे), गोल्या ऊर्फ अरूण कैलास रजपुत (रा. बावधान बु. पुणे), सचिन तानाजी रजपुत (वय 25, रा. कासारआंबोली भवानी नगर, ता. मुळशी जि. पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथील भरत उर्फ भुषण शंकर चोरगे (27, रा. बावधन बु. पुणे) याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर रोजी त्या तरुणाने त्या महिलेला रात्री दोन मिसकाॅल दिले. त्यावेळी महिलेच्या पतीने मिसकॉल पाहिल्यावर पत्नीला विचारणा करून तिला मारहाण केली. मारहाण केल्याने महिला पळून गेली.

दरम्यान संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर मयत भुषण चोरगे त्याठिकाणी महिलेस भेटण्यासाठी आला. संबंधीत व्यक्ती आल्याचे कळताच महिलेच्या पतीने व त्याचे दोन साथीदार यांनी मिळून त्याला मारहाण करून त्याला धारधार शस्त्राच्या सहाय्याने छातीवर व पोटात वार केले. जखमी अवस्थेत त्याचे बोलेरो गाडीतुन अपहरण केले.

त्याच्या खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. पुरावा नष्ट करण्यासाठी तसेच विल्हेवाट लावण्यासाठी उरवडे गावात असलेल्या त्याच्या दारुच्या भट्टीमध्ये त्याला दोन दिवस जाळले.मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख व इतर अवशेषाची घोटावडे परीसरातील नदीवर व नाल्यात टाकून विल्हेवाट लावली. त्यानंतर त्याचा एक खुनामध्ये सहभागी नसलेला सहकारी सचिन राजपुत यास मयत भुषण चोरगे याची बॉडीची राख व अवशेष पोत्यात भरुन उरवडे येथील एका नाल्यात टाकली आहे असे सांगून मुख्य आरोपी मध्यप्रदेश येथे पळून गेले.

दरम्यान भुषण चोरगे रात्री घरी आला नाही म्हणून त्याची आई शांता शंकर चोरगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात भुषण हरवल्याची तक्रार दिली. या मिसिंगचा तपास करताना संशयित लंकेश राजपुत याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने काहीएक उपयुक्त माहीती दिली नाही.

दरम्यान, भुषण चोरगे मिसींग झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भुषण चोरगे यांच्या आईला त्याची एकच चप्पल संशयित लंकेश राजपुत याच्या घरासमोर मिळाली. तसेच भुषण व लंकेश यांची 21 ऑक्टोबर रोजी रात्री वादावादी झाल्याचेही पोलिसांना समजले.

पोलिसांनी आरोपी लंकेश राजपुत, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन रजपुत, व त्याचा इतर एक साथीदार यांनी भुषण चोरगे यांचे अपहरण केल्या बाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात संशयित आरोपी म्हणून सचिन राजपुत याला अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने मुख्य आरोपी लंकेश राजपुत व अरुण राजपुत अशा तिघांनी मिळून मध्यप्रदेश येथे पळून जाण्याच्या अगोदर भुषण चोरगे यांचा खुन करुन बॉडी जाळल्याचे व राख टाकून देऊन विल्हेवाट लावल्याचे सांगितले.

राख टाकलेले ठिकाण आरोपीने दाखवले असताना उरवडे गावाच्या नाल्यात दोन पोती मिळाली. त्यामध्ये शेळीची बॉडी कापून टाकली असल्याचे दिसले व पोलीसांना चकवण्यासाठी सदरची व्युहरचना केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यानच्या काळात फरारी मुख्य आरोपी लंकेश व त्याचा साथीदार अरुण यांचा शोध घेत असता ते दोघे मध्यप्रदेश येथे लपून बसले आहेत अशी बातमी मिळाल्याने एक टिम तयार करून मध्यप्रदेश येथे जाऊन आरोपींना अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.