मुंबई : आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे दररोज नवंनवीन माहिती समोर आणून धक्का देत आहेत. मलिक यांनी शनिवारी सकाळी पुन्हा एकदा ट्विटरवरुन समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केलीय.
“आर्यन खानचं अपहरण आणि त्याच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी समीर दाऊद वानखेडेंची एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी मी केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. पाहुयात, यापैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचं सत्य जगासमोर आणतं ते”, असं ट्वीट नवाब मलिक यांनी शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास केलं आहे.
याचसंदर्भात पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, “नवाब मलिकांनी बहुतेक मंत्रीमंडळामधून राजीनामा दिलाय. तुम्ही जर मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहात तर तुम्ही प्रेसच्या माध्यमातून का मागणी करताय,” असं म्हणत मलिक यांना टोला लगावला.