महापालिका प्रभाग आराखडा आणि आरक्षण लवकरच जाहीर होण्याची शक्यता

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम निवडणूक विभागाने पूर्ण केल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार तयार करण्यात आलेला प्रभाग रचनेचा हा प्रारूप आराखडा कोणत्याही क्षणी जाहीर करण्यासाठी महापालिकेचा निवडणूक विभाग सज्ज आहे. ज्यादिवशी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात येईल, त्याचदिवशी आरक्षण सोडतही काढण्यात येणार आहे. हा दिवस याच आठवड्यात असेल की पुढच्या आठवड्यात हे महापालिका आयुक्त राजेश पाटील निश्चित करणार आहेत. प्रभाग रचना कशी असेल?, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असेल?, ओबीसी आरक्षण असणार की नाही?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे. या आगामी निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आधी एक नगरसेवक एक वॉर्ड पद्धत निश्चित केली होती. नंतर त्यात बदल करून दोन सदस्यीय प्रभाग रचना म्हणजे एक प्रभाग दोन नगरसेवक पद्धत ठरवण्यात आली. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे या प्रभाग पद्धतीवरून तीन्ही राजकीय पक्षांमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले. त्यामुळे प्रभाग रचनेत पुन्हा बदल करून तीन सदस्यीय म्हणजे एक प्रभाग तीन नगरसेवक पद्धत निश्चित करण्यात आली. राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस या तीन राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार बनवलेले आहे. या तिन्ही पक्षांच्या मतानुसार प्रभाग रचनेत तीन-तीन वेळा बदल करण्यात आले. त्यामुळे प्रभाग रचना तयार करणाऱ्या प्रशासनाला प्रभाग रचनेतही तीन-तीन वेळा बदल करावे लागले आहेत.

आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना तयार करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याचा अर्थ ३० नोव्हेंबरपर्यंत कधीही प्रभाग रचना तयार करून त्याचा प्रारूप आराखडा जाहीर करणे महापालिकेला बंधनकारक आहे. दरम्यान राज्य सरकारने महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्येतही वाढ केली आहे. नगरसेवकांची संख्या आधी १२८ होती आता ती १३९ इतकी केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने आगामी निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. ही प्रभाग रचना २०११ च्या लोकसंख्येनुसार तयार करण्यात आली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची (एससी) लोकसंख्या २ लाख ७३ हजार ८१० आणि अनुसूचित जमातीची (एसटी) लोकसंख्या ३६ हजार ५३५ इतकी आहे.  

या लोकसंख्येनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४६ प्रभाग तयार होणार आहेत. त्यातील ४५ प्रभाग हे तीन नगरसेवकांचे आणि १ प्रभाग हा चार नगरसेवकांचा असणार आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने ४६ प्रभागांच्या रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. आता हा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवताच महापालिका आयुक्त राजेश पाटील हे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आणि आरक्षण सोडत एकाच दिवशी जाहीर करणार आहेत. त्यानुसार याच आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आणि आरक्षण सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.