पिंपरी चिंचवड मधून बनावट स्कॉच व व्हिस्की जप्त; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पिंपरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच पुण्यातील वारजे माळवाडी येथे मोठी कारवाई करुन 52 लाखांचा मद्यसाठा जप्त केला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये बनावट स्कॉच व व्हिस्की विक्रीचा पर्दाफाश केला आहे. पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथे केलेल्या कारवाईत 6 लाख 71 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली आहे. दिवाळी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे बनावट दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील झिंजुर्डे चाळीतील पत्र्याच्या खोलीत कमी प्रतीचे मद्य उच्च प्रतिच्या रिकाम्या स्कॉचच्या बाटलीत भरून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता कांजी शामजी पटेल हा उच्च प्रतीच्या स्कॉचच्या रिकाम्या बाटलीमध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य भरताना आढळून आला.

खोलीची झडती घेतली असता खोलीमधून विविध कंपन्यांच्या उच्च प्रतिच्या स्कॉचच्या 65 सिलबंद आणि 724 रिकाम्या बाटल्या, बुचे, लेबल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, पुण्याचे अधीक्षक संतोष झगडे, उप अधीक्षक एस.आर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क (ई विभागातील) निरीक्षक एस.एम. परळे, पी.एस. सेतसंदी, एन.आर. मुंजाळ, दुय्यम निरीक्षक व कर्मचारी एस.वाय. दरेकर, डी.बी गवारी, एन.यु. जाधव, ए.आर. दळवी, एन.एस पिंगळे, समीर बिरांजे राजू पोटे यांच्या पथकाने केली.
Leave A Reply

Your email address will not be published.