पिंपरी : शिवसेनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडे केली होती. भाजपची सत्ता असल्यामुळे सोमय्या याठिकाणच्या चौकशीची मागणी करणार नाहीत, असे शिवसैनिकांना निदर्शनास आणून द्यायचे आहे. असे असले तरी किरीट सोमय्या हे उद्या रविवारी (दि. 21) पिंपरी-चिंचवडमध्ये येणार असल्याची माहिती समजते. उद्या सोमय्या हे शहरात येऊन कोणता बॉम्ब फोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सोमय्यांनी कौशल्य पनाला लावले आहे. सरकारमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सीबीआय, ईडीमार्फत अनेकांची चौकशी देखील लावली आहे. सोमय्यांच्या भूमिकेच्या निषेधार्त पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेने महापालिकेत भाजपा महापौरांच्या दालनासमोर आंदोलन केले. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पदाधिका-यांची चौकशी सोमय्यांनी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली होती. त्यांचे नेते संजय राऊत यांच्यामार्फत स्मार्ट सिटीतील 500 कोटींच्या घोटाळ्याची फाईल देखील सोमय्या यांच्याकडे पाठविल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर उद्या सोमय्या हे शहरात आल्यानंतर खरोखर यावर खुलासा देतील का, याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराबाबत शिवसेनेने ३ जुलै २०२१ रोजी पुराव्यांसह लेखी पत्र महापालिका आयुक्तांना दिले होते. त्या पत्रातच ठेकेदार कंपनी, अधिकारी आणि भाजप नेत्यांत कसे संगनमत आहे, हे उघड करण्यात आले होते. बाजारात १० हजार रुपयांना मिळणारा पाण्याचा मीटर या कंपनीने १ लाख १५ हजार रुपयांना खरेदी केला. असे ९ हजार पाणी मीटर खरेदी केले. म्हणजे २२ कोटी रुपयांच्या पाणी मीटरसाठी चक्क ११० कोटी रुपये मोजण्यात आले. त्याचे सर्व बील पालिकेने अदा केले आहे, असा आरोप उबाळे यांनी केला होता.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांची कंपनी असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामात गैरव्यवहार झाल्याची शिवसेनेची तक्रार आहे. त्यामुळे त्याची फाईल सोमय्यांकडे देताच त्यांची बोबडी वळली. तोंड बंद झाले, असा आरोप उबाळे यांनी केला होता. आता सोमय्या हे लाड यांच्या कंपनीच्या भ्रष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी करतील का ? तसेच, या भ्रष्टाचारात सहभागी स्थानिक सत्तधारी, विरोधक आणि प्रशासनातील अधिका-यांची नावे पिंपरी-चिंचवडकरांच्या समोर मांडतील का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.