आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांचा राडा; किरीट सोमय्यांचा काढता पाय

‘जवाब दो.. जवाब दो.. किरीट सोमय्या जवाब दो..’

0

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पिंपरी भाजपा कार्यालयाला भेट दिली. सोमय्या कार्यक्रम आटोपून निघाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. काळे झेंडे दाखवून निषेध करत स्मार्ट सिटीच्या 500 कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात ‘जवाब दो.. जवाब दो.. किरीट सोमय्या जवाब दो..’ अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी राडा घातला. शिवसैनिकांचे अक्राळ विक्राळ अवतार पाहून सोमय्यांनी काढता पाय घेतला.

शहर शिवसेनेच्या वतीने सोमय्या यांना पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे निवेदन देण्यात येणार होते. त्यासाठी शिवसैनिक भाजपा कार्यालयाच्या गेटवर थांबले होते. सर्व कार्यक्रम आटोपून सोमय्या बाहेर येताच शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र, शिवसैनिकांचा तांडव पाहून निवेदन न घेताच सोमय्यांच्या गाड्यांचा ताफा मोरवाडी न्यायालयाच्या दिशेने दामटण्यात आला. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, स्थायी समिती सभापतींचे लाच प्रकरण, होर्डींग्जच्या खोट्या बिलांमध्ये झालेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार, श्वान नसबंदी घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची सोमय्यांकडून उत्तरे मागण्यासाठी शिवसैनिक पुढे आले होते. मात्र, सोमय्या यांनी यातील एकाही प्रश्नाचे उत्तर न देता फडणवीस मुख्यमंत्री असताना भोसरीतून जसे पळून गेले, तशाच प्रकारे त्यांनी सुध्दा पळ काढला.

घाबरला रे.. घाबरला.. किरीट सोमय्या घाबरला, पळपुट्या किरीट सोमय्याचा धिक्कार असो…, किरीट सोमय्या हाय हाय… अशा घोषणा देत स्मार्ट सिटीची चौकशी झालीच पाहिजे…, कुत्र्याची चौकशी झालीच पाहिजे… अशी नारेबाजी करण्यात आली. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विकास कामांत भ्रष्टाचाराची मालिका सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांत कोट्यावधी रुपये लाटले आहेत. यासंदर्भात सखोल चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, याचे निवेदन देण्यात येणार होते. ते निवेदन न घेताच सोमय्यांनी पळ काढला. सोमय्यांचा आजचा दौरा हा आगामी महापालिका निवडणुका लढविण्यासाठी भ्रष्टाचार करून पार्टीला फंड गोळा करण्याचा सल्ला देण्यासाठी होता, अशी टिकाही शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक एड. सचिन भोसले यांनी केली.   

यावेळी शहरप्रमुख भोसले यांच्यासह जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, आनंत को-हाळे, योगेश बाबर, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संतोष सौदणकर, रुपीनगर शाखेचे नितीन बोंडे, पिंपरी शाखाप्रमुख निलेश हाके आदींसह शिवसैनिक आंदोलनात सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.