आमदारांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकणारे ताब्यात

0

पिंपरी : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. शहरातील लोकप्रतिनिधीच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य जनतेचे काय ? असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करत तिघांना ताब्यात घेतले आहे. तिघेही कासारवाडीतील रहिवासी आहेत. या तिघांनी गुन्ह्यासाठी वापर केलेल्या दुचाकीच्या रंगावरून तपास करत पोलिसांनी पहाटे दोन वाजता त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली होती.

माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे पिंपळेगुरव येथे चंद्ररंग डेव्हलपर्स या नावाचे कार्यालय आहे. काल मंगळवारी (दि. २३) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास कार्यालयासमोरील रस्त्यावरून एका भरधाव दुचाकीवरून तीघेजण आले. त्यांनी शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या महावितरणच्या डीपी बॉक्सवर पेट्रोल बॉम्ब फेकला. त्यानंतर कार्यालयाच्या शटरवर दुसरा पेट्रोल बॉम्ब फेकला. दोन पेट्रोल बॉम्ब फेकून तिघेही भरधाव वेगाने निघून गेले.  

या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्वतः पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे देखील घटनास्थळावर आले. त्यांनी घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. माजी नगरसवेक शंकर जगताप यांच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व घटना कैद झाली होती. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या तिनही आरोपींनी तोंडाला रुमाल बांधल्याचे आणि गाडीच्या नंबर प्लेटला काळे फासल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. हे फुटेज बारकाईने पाहिल्यानंतर दुचाकीचा रंग पोलिसांसाठी महत्त्वाचा सुगावा ठरला.

दुचाकीचा रंग पिवळा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या आधारावर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरात दुचाकीला पिवळा रंग असलेल्या किती गाड्या आहेत याचा तपास करण्याचे आदेश सांगवी पोलिसांना दिले. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवली आणि दुचाकीचा पिवळा रंग असलेल्या शहरातील सर्व गाड्या रात्रीच तपासल्या.

त्यातील एक गाडी कासारवाडीतील एकाकडे आढळली. त्याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या तिघांचाही शोध लागला. पोलिसांनी रात्रीच या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. तिघेही आरोपी कासारवाडीतील आहेत. या प्रकरणात पोलिसांचा अद्यापही तपास सुरू आहे. आरोपींनी हे कृत्य कशासाठी व कोणाच्या सांगण्यावरून केले, याचा पोलिस तपास करत आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.