पिंपरी : मास्क खरेदी प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द झालेबाबत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. वास्तविक, विभागीय आयुक्तांनी याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार, केवळ निर्षक नोंदवला आहे. त्यामध्ये नगरसेवकपद रद्द करण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही, असे स्पष्ट झाले आहे.
कोरोना काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेला १० लाखांचे मास्क पुरविणा-या एॅडीसन लाईफ सायन्स कंपनीला राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, त्यांचे पती यांनी कंपनीला दिर्घ मुदतीचे कर्ज दिल्याचे निदर्शनास आले. धर यांचा कंपनीशी मास्क खरेदी प्रक्रियेवेळी संबंध असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे धर या महापालिका सदस्य म्हणून पदावर राहण्यास अनर्ह आहेत. त्यांना अपात्र करावे असा स्पष्ट निष्कर्ष विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला. मात्र, पद रद्द करण्याबाबत कोणताही आदेश अद्याप महापालिका प्रशासनाला प्राप्त झालेला नाही, असे सूत्रांकडून समजले.
विशेष म्हणजे, मास्क खरेदी प्रक्रियेवेळी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पती संबंधित कंपनीचे संचालक नाहीत. तसेच, लेखापरीक्षण अहवालावरून राजू धर यांचे सर्व शेअर्स हस्तांतरित झाल्याचे निर्शनास येते, असाही निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी नोंदवला आहे.
शिवसेनेचे जितेंद्र ननावरे यांनी मास्क खरेदी प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग घेवून आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पद रद्द करावे, अशी मागणी केल्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पुणे विभागीय नगर परिषद, सह आयुक्त यांना दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तत्कालीन आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेथे मास्क उपलब्ध होतील, तेथून थेट पद्धतीने जनतेच्या सुरक्षीततेसाठी तातडीने खरेदी करण्यात आले. सदर प्रकरणात सुलक्षणा शिलवंत-धर यांचे वैयक्तीक हितसंबंध दिसून आल्याचे दिसत नाहीत. सुलक्षणा शिलवंत-धर यांच्याशी संबंधित असलेली मे. एडीसन लाईफ सायनस प्रा. लि. या कंपनीने उद्देशपूर्व मास्क खरेदी प्रकरणामध्ये भाग घेतला असे म्हणता येणार नाही. किंबहुना कोविड सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिका प्रशासनाने मास्क खरेदीची जबाबदारी दिल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.