मुंबई : मुंबई, पुणे सोबतच महाराष्ट्रातील अनेक शहरांत आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हवामान विभागाने बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाची मागील १० वर्षांत दुसऱ्यांदा नोंद झाली. सदर वर्षी नोव्हेंबर मध्ये किमान ३०.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. तसेच, २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक १०९.३ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान खात्याच्या माहिती प्रमाणे, महाराष्ट्र मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असून पावसाची ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. आता मुंबई, ठाणे आणि पालघर येथे आज यलो अलर्ट जारी करण्यात आला. परंतु, या आठवड्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि मालदीव, लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळामुळे पाऊस पडतोय. यामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून सदर स्थितीत पुढील २४ तास महाराष्ट्रातील सागरी भागात पावसाची शक्यता आहे.