पिंपरी : ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ओळखपत्राचा वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 3) आयोजित केला होता. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मात्र गव्हाणे यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी दांडी मारली होती. पक्षातील प्रमुख पदाधिकारीच नसल्याने सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय उलथापालथ सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विद्यमान पदाधिकाऱ्यांचे तातडीने राजीनामे घेतले आहेत. त्या ऐवजी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती. दरम्यान मोठ्या घडामोडी झाल्याने सध्या तरी ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. शहराध्यक्ष कोण होणार या बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. शहराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अजित गव्हाणे यांचे नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गव्हाणे देखील त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचा मनसुभा त्यांनी उघडपणे व्यक्त केला आहे.
मात्र गव्हाणे यांच्या नावाला पक्षातीलच नेत्यांची नापसंती असल्याचे दिसते. गव्हाणे यांचा प्रभाव केवळ त्यांच्याच प्रभागात असल्याची भावना कार्यकर्ते व पदाधिकारी व्यक्त करत आहेत. संपूर्ण शहरात त्यांचा प्रभाव पडणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे गव्हाणे यांच्या नावाला नापसंती व्यक्त केली जात आहे. त्याचा प्रत्यय अजित गव्हाणे यांनी घेतलेल्या कार्यक्रमात आला. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार प्रमुख नेते उपस्थित असणे गरजेचे होते. मात्र स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवल्याने कार्यक्रम फेल गेल्याची चर्चा आहे.
नगरसेवक अजित गव्हाणे यांनी घेतलेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक योगेश बहल आदीसह अनेक प्रमुख नेते अनुपस्थित होते.
खा. कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजप नगरसेविका प्रियांका बारसे यांची उपस्थिती चर्चेचा विषय झाला आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्यानेच नगरसेवक अजित गव्हाणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली.