पिंपरी : सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा धडाकाच लावलेला आहे. रविवारी विनापरवाना देशी विदेशी दारूच्या विक्री प्रकरणी तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलवर, तसेच शाळेच्या जवळील परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री प्रकरणी निगडी येथील तीन दुकानावर कारवाई करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या चार वेगवेगळ्या कारवाईत 13 लाख 47 हजार 670 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.02) ही कारवाई करण्यात आली.
तळेगाव एमायडीसी कडून वडगाव मावळकडे जाणा-या रस्त्यावर असणा-या हॉटेल गारवा याठिकाणी केलेल्या कारवाईत विनापरवाना देशी – विदेशी दारूची केली जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी आरोपी गणेश एकनाथ घोजगे (वय 32, रा. आंबी, मावळ, पुणे) याच्या विरोधात तळेगाव एमायडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत 11 लाख 23 हजार 370 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शाळेच्या 100 यार्ड त्रिजेच्या क्षेत्रात सिगारेट, तंबाखूजन्य उत्पादन विक्री करण्यास बंदी आहे. तरीही निगडीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी श्री गणेश मंदीर, निगडी गावठाण येथे केलेल्या कारवाईत रजनीकांत मुरलीधर काळे (वय 58, रा. रूपीनगर, तळवडे) यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, निगडीतील उर्सेुला शाळेच्या पाठिमागे एका पानटपरीवर कारवाईत करण्यात आली. याप्रकरणी पवनकुमार राजेंद्रप्रसाद अग्रवाल (वय 40, रा. दत्तवाडी, रा. आकुर्डी, निगडी) याच्या विरोधात निगडी पोसीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडी गावठाण येथे वैधानिक इशारा व किंमत नसलेल्या सिगारेटची विक्री करणा-या पानटपरी धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र उर्फ नारायण श्रीचंद रोहरा (वय 47, रा. पिंपरी, पुणे) असे या टपरीधारकाचे नाव आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने चारही ठिकाणी केलेल्या कारवाईत 13 लाख 74 हजार 670 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.