मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर राज्य सरकारशी तडजोड करण्यासाठी आपण दबाव आणला नाही, असे डीजीपी संजय पांडे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
संजय पांडे यांनी म्हटले की, परमबीर सिंह यांनी स्वत: माझ्याशी संपर्क साधला होता आणि सांगितले होते की ते खूप तणावात आहेत आणि त्यांना हे प्रकरण संपवायचे आहे. त्यासाठी त्यांनी मदत मागितली होती. त्यानंतर मी त्यांच्यासोबत बोललो. मला हे प्रकरण संपवण्यसाठी सरकारकडून कोणतेही आदेश मिळाले नव्हते. तसेच मी स्वत:हून हे प्रकरण संपवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. परमबीर सिंहांनी पूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडले असून त्याचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन घेतला आहे.
दरम्यान, 2 डिसेंबर रोजी राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांसाठी आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना निलंबित केले होते. त्यांच्यासह इतर आरोपी पोलीस अधिकारी पराग मणेरे यांनाही निलंबित केले आहे. सिंह यांच्या काळात पराग मणेरे हे ठाणे आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त होते.