मुंबई : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या ठाकरे यांच्या घरची सून होणार आहे.
पाटील यांनी आज (मंगळवार) मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्था’वर ते आपली कन्या आणि चिरंजीवासह आले होते. लग्नसोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील राज ठाकरे यांच्या घरी आले होते. अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.
हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या ठाकरे घराण्याच्या सून होणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव यांचे सुपूत्र निहार ठाकरे यांच्यासोबत अंकिता यांचा विवाह होणार आहे. हा विवाह सोहळा येत्या 28 डिसेंबरला मोजक्या लोकांच्या उपस्थित होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याच विवाह सोळ्याचे आमंत्रण देण्यासाठी ते आज राज ठाकरे यांच्या घरी आले होते.
अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली व्यवसायात जम बसविला आहे. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि एक वर्ष हार्वर्डमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाची चर्चा रंगली होती. अखेर हर्षवर्धन पाटील यांनी या दोघांच्या विवाहाची अधिकृत माहिती जाहीर केली.
बिंदूमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते. त्यांच्या निधनाचा बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार ठाकरे यांचे सख्ख्ये काका आहेत. तर मनसे प्रमुख राज ठाकरे हे चुलत काका आहेत. या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत.