पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शाखेनं कारवाई करत लॉजमध्येच सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. महामार्गालगत असलेल्या द्वारका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी 10 महिलांची सुटका केली आहे तर एकाला अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मॅनेजर गविरंगा गौडा (38) याला अटक केली आहे. तर सुटका करण्यात आलेल्या महिलांना पुण्यातील एका स्वंयसेवी संस्थेकडे सोपवलं आहे.
देहुरोड परिसरात मुंबई-बुंगळुरू महामार्गावर असलेल्या हॉटेल द्वारका लॉजिंगमध्ये देहविक्रीचं रॅकेट सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर सामाजिक शाखेच्या पथकाने छापा टाकला.
लॉजची झाडाझडती घेताना पोलिसांना आतमध्ये 10 महिला आढळून आल्या. यात 4 महिला या पश्चिम बंगालमधील आहेत. तर 2 कर्नाटक, 1 आसाममधील आणि 3 महिला महाराष्ट्रातील आहेत. लॉजचा मॅनेजर या महिलांकडून जबरदस्तीने देहविक्री करुन घ्यायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एजंट ग्राहकांकडून 3 हजार रुपये घ्यायचे आणि देहविक्री करणाऱ्या महिलांना 500 रुपये द्यायचे. छापेमारी करताना पोलिसांनी लॉजमधून 2 मोबाईलसह रोख 25 हजार 700 रुपये जप्त केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. डोंगरे, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अमलदार सुनील शिरसाट, विजय कांबळे,संतोष बर्गे, नितीन लोंढे, किशोर पढेर, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अनिल महाजन ,जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, राजेश कोकाटे, भगवंत मुठे यांच्या पथकाने केली आहे.