मेट्रोचे जाळे आणखी वाढविण्यासाठी महामेट्रोकडून नवीन चार मार्गांची मागणी

0

पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात (पीएमआरडीए) मेट्रोचे जाळे विस्तारण्याची तयारी महामेट्रोने दाखवली आहे. यासाठी नवीन चार मार्गांवर मेट्रो प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी महामेट्रोने पीएमआरडीएला केली आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, वनाज ते रामटेकडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या तीन मार्गांचे काम सध्या सुरू असून, आता पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या चार मेट्रो प्रकल्पांची शिफारस करण्यात आली आहे. स्वारगेट ते खडकवासलादरम्यान नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), वारजे ते स्वारगेट, वाघोली ते पवार वस्ती (हिंजवडी) आणि चांदणी चौक ते हिंजवडी असे मार्ग आहेत.त्यासाठी पीएमआरडीएने करून घेतलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील मार्गांची माहिती महामेट्रोने मागविली आहे. या माहितीच्या अधारे प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गांचे सर्वेक्षण करून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

पीएमआरडीएने सुमारे सात हजार २०० चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे काम ‘एल ॲण्ड टी’ कंपनीकडून करून घेतले. त्यामध्ये मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, रिंगरेल आणि बीआरटी, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, नवीन बस डेपो, रेल्वे स्टेशनचे अद्ययावतीकरण, नवीन रस्ते विकसित करणे या मोठ्या प्रकल्पांसह प्रमुख चौकांचे रुंदीकरण असा सुमारे ५४ हजार ६०१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस प्राधिकरणाला केली आहे.

मेट्रोसाठी आवश्‍यक प्रवासीसंख्या नसल्याने त्यापेक्षा कमी खर्चामध्ये हे पर्याय प्रस्तावित केले आहेत. मेट्रो आणि लाईट मेट्रो असे मिळून सुमारे १९५ किलोमीटर लांबीचे मेट्रो प्रकल्पाचे जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. तर या मार्गाचे लोणीकाळभोर आणि सासवडपर्यंत विस्तारीकरणाचे काम देखील पीएमआरडीएकडेच देण्यात आले आहे. मात्र, उर्वरित प्रस्तावित मेट्रो मार्ग विकसित करण्याची जबाबदारी यापूर्वीच महामेट्रोकडे देण्यात आली आहे.

‘एलएनटी’च्या अहवालातील प्रकल्पमोनो रेल, लाइट रेल, रिंगरेल आणि बीआरटी, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, नवीन बस डेपो, रेल्वे स्टेशनचे अद्ययावतीकरण, नवीन रस्ते विकसित करणे.काम सुरू असलेले मार्ग…पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटवनाज ते रामटेकडी (महामेट्रोकडून)हिंजवडी ते शिवाजीनगर (महामेट्रोकडून)

प्रस्तावित मेट्रो मार्ग…स्वारगेट ते खडकवासला (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता)वारजे ते स्वारगेटवाघोली ते पवार वस्ती (हिंजवडी)चांदणी चौक ते हिंजवडीप्रस्तावित मार्गांचे होणार सर्वेक्षणप्रस्तावित मेट्रो मार्गांचे सर्वेक्षण करण्यासाठी आवश्‍यक माहिती आणि परवानगी महामेट्रोने पीएमआरडीएकडे मागितली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कार्यकारी संचालक पी. के. आचार्य यांनी त्यासंदर्भात पीएमआरडीएला पत्र पाठविले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.