‘मला इथंली सगळी अंड्डी पिल्ल माहिती आहेत’ : अजित पवार

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांमधील गटबाजी, स्वतंत्रपणे विरोध करण्याची भूमिका, सत्ताधारी भाजपमधील नेत्यांशी असलेले मैत्री यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पदाधिका-यांचे चांगलेच कान टोचले. मला इथंली सगळी अंड्डी पिल्ल माहिती आहेत. सर्वांनी एकत्रितपणे चुकीच्या कामाला प्रखरपणे विरोध करावा. मॅच फिक्सिंगची भूमिका घेऊ नका असा प्रेमाचा सल्लाही दिला.

अजित पवार म्हणाले, चुकीच्या कामाला विरोध करा, आंदोलने करावीत. सर्वांनी एकदिलाने आवाज उठवावा. भ्रष्टाचाराबाबत निवेदन, प्रेस सर्वांनी एकत्रितपणे घ्यावी. एकत्र लढा दिला पाहिजे. एकाने निवेदन दिले की ते त्याचेच काम आहे असे म्हणू नका, मला पिंपरी-चिंचवड नवीन नाही. इथंली सगळी अंड्डी पिल्ल माहिती आहेत. मी तुम्हाला प्रोत्साहन, उर्जा देणार आहे. मी एकटा काही करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी चुकीच्या कामाला विरोध केलाच पाहिजे. मागील निवडणुकीत विरोधकांनी प्रशासनाकडील चुकीच्या कामाचे खापर राष्ट्रवादीवर फोडण्याचे काम केले. काही बाबतीत ते लोकांना सत्य वाटले आणि पालिकेतील आपली सत्ता गेली.

त्यामुळे चुकीच्या कामाला प्रखर विरोध आणि आंदोलन केले पाहिजे. काहींना आपण विरोधी पक्षात आहे. याचे भान राहिले नाही. सत्तेत असल्यासारखेच वागत आहेत. राष्ट्रवादीने चार सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळविले. 2017 मध्ये अपयशी झाले. जनतेपर्यंत कामे पोहचविण्यात कमी पडलो. विरोधकांनी फोडा-फोडी केले. आता गट-तट सगळ्या गोष्टी क्यातून काढा. इथं बसलेल्या सर्वांच्या कमी अधिक प्रमाणात चुका झाल्या आहेत. काही योग्य पद्धतीने वागले. परंतु, आपल्या चुकामुळे पक्षाला किंमत मोजावी लागेल याचा विचार करावा. त्याचा फटका काम करणा-या कार्यकर्त्यांला बसतो हे नाकारता येणार नाही.

प्रत्येकाचे मित्रत्वाचे संबंध असतात. परंतु, ते संबंध कुठपर्यंत असावेत. त्याचे देखील कुठं तरी आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण आपली भूमिका अॅग्रेसिव्हिली लोकांच्या समोर मांडू, त्याचवेळेस जनतेला ते समजायला वेळ लागत नाही. बोटचेपे धोरण घेतले तर लोकांच्याही लक्षात येते. यांचे काय चाललयं, यांचे मॅच फिक्सिंग चाललयं, काय आणखीन काय चाललयं, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

माझेही विरोधकांशी संबंध चांगले होते. परंतु, मी माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही कोणाशी फिक्सिंग केली नाही. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे मनापासून काम करायचे, त्याला निवडून आणण्यासाठी पूर्णपणे ताकद पणाला लावायची. तु त्या वॉर्डात आम्हाला मदत कर मी तुला या वॉर्डात मदत करतो असले प्रकार काही इथे घडतात. सगळेच करत नाही. पण, काही काही करतात. त्याचा फटका काम करणा-या कार्यकर्त्यांना बसतो. घरातच घरभेदी असेल तर काहीही होत नाही. त्यामुळे असल्या सवयी असतील तर त्या काढून टाका असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.