पुणे : पुणे सायबर पोलिसांनी म्हाडाच्या पूर्व परिक्षेचा पेपर फोडणार्यांवर कारवाई केली आहे. सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे परिक्षा रद्द करण्यात येत असल्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी Twitter वर रात्री उशिरा जाहीर केले आहे.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या परीक्षा होणार नाही.
प्रितेश देशमुख (रा. पुणे), संतोष हरकळे आणि अंकुश हरकळे (रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा कंत्राटदार असून संतोष व अंकुश हे त्याचे मित्र आहेत. देशमुख याने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे.
म्हाडाची पूर्व परिक्षा आज होणार होती. तसेच वेगवेगळ्या पदासाठी या आठवडा भर परिक्षा घेण्यात येणार होती. या सर्व परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारीत घेण्यात येणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून सांगतो की, उद्याची होणारी परिक्षा व या आठवड्यात होणार्या सर्व परिक्षा काही अपरिहार्य कारणावरुन व तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही माहिती मी इतक्या रात्री देत आहे कारण की विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी परिक्षा केंद्रावर जाऊ नये. त्यांनी घरीच थांबावे.