पुणे : पैसे घेतल्यानंतरही फ्लॅटचा ताबा न देता बनावट कागदपत्रे तयार करुन पुणे महापालिकेला सादर करुन त्याद्वारे प्रॉपर्टी टॅक्स काढून ग्राहक आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आकृती जय डेव्हलपर्सच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आकृती जय डेव्हलपर्सचे मालक व्योमेश महिपतराय शहा, व्यवस्थापक जस्मीन राठोड आणि अकाऊंटंट अभिषा वैरेनकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल मल्लिकार्जुन सिंदगी (37, रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 18 जुलै 2011 ते 12 मार्च 2021 दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल सिंदगी यांनी आकृती जय डेव्हलपर्सच्या कोंढवा येथील प्रकल्पात फ्लॅट खरेदी करण्यासाठी वेळोवेळी 22 लाख 95 हजार 851 रुपये 2011 पासून दिले. असे असतानाही त्यांनी फिर्यादी यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच व्यवस्थापक जस्मीन आणि अकाऊंटंट अभिषा यांनी फिर्यादी यांना तुम्हाला तुमचा फ्लॅट मिळू देणार नाही. काय करायचे आहे ते करा अशी धमकी दिली.
फिर्यादीबरोबर फ्लॅटचा करारनामा त्यांच्या नावावर झालेला नसतानाही बांधकाम व्यावसायिक शहा
यांनी पुणे महानगर पालिकेला खोटे दस्तऐवज सादर करुन ते खरे असल्याचे भासविले. त्यामुळे महापालिकेने 2017 पासून प्रॉपर्टी टॅक्स फिर्यादीच्या नावाने काढले. फिर्यादी आणि महापालिकेची फसवणूक केली. फिर्यादी यांचा फ्लॅट प्लॅन प्रमाणे न बांधता दुसर्याच ठिकाणी बांधुन फिर्यादी यांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.