शहरातील शाळा गजबजल्या, विद्यार्थ्यांचे स्वागत, चिमुकल्यांचा उत्साह

0

पिंपरी : कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेल्या शहरातील शाळा पावणे दोन वर्षांनी पुन्हा गजबजल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या. विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.

कोरोनाकाळानंतर प्रथमच या इयत्तेतील विद्यार्थी शाळेत आल्याने अनेक ठिकाणी व्यवस्थापनाने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले, तर काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करत गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत केले. चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती. शाळेतील पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. शिक्षक, मित्र-मैत्रिणीच्या भेटीने चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण आले. आज अनेक शाळा सुरू झाल्या. तर, काही शाळा सोमवार आणि नाताळ नंतर सुरू होणार आहेत.

दरम्यान,  कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरण विषय सुविधा सुनिश्चित कराव्यात. जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धतता करावी. ज्या  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत. अशांना 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी ठेवावे.

शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्ग खोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. कोरोना नियमांबाबत पाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.