100 सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध

वाकड पोलिसांचा चांगला तपास

0

पिंपरी : काळेवाडी फाट्यावर सात वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना धडक देऊन पळून गेलेला अज्ञात वाहन चालक वाकड पोलिसांनी शोधला आहे. परिसरातील तब्बल 100 सीसीटीव्ही कॅमेरे तपासात पोलिसांनी आरोपीचा माग काढला. या अपघातात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 8 डिसेंबर रोजी पहाटे पावणे पाच वाजता घडला.

संघर्ष कनवरलाल गवळी (वय 7) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय 35), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले आहेत.

पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी पहाटे तिघांना एका वाहनाने धडक दिली. त्यानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सात वर्षांचा मुलगा संघर्ष याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचे आई आणि वडील जखमी झाले होते.

वाकड पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी काळेवाडी फाटा परिसरातील सुमारे 100 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक आरसा आढळला होता. तो वाहनाच्या डाव्या बाजूचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरून देखील तपास करण्यात आला. हा अपघात एका टेम्पोने केला असून तो टेम्पो थेरगाव येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला. त्यावरील चालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी हा टेम्पो त्याचा मित्र तेजस शशिकांत बारसकर (वय 19, रा. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी) याच्याकडे होता. पोलिसांनी तेजस याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अपघात झाल्यानंतर आरोपी तेजस घटनास्थळावरून घाबरून पळून गेला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, पोलीस नाईक अतिक शेख, पोलीस नाईक विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.