पुणे : पोलिसांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज पाठीमागे घेण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडेच 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशीरा अटक केली. याप्रकरणी सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्यासह चौघांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोथरूड येथील एका (48 वर्षीय) महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीवर २०१८- २०२० मध्ये डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयाबाबत फिर्यादी यांनी आल्हाट याच्याकडे संपर्क केला होता. त्यावेळी आल्हाट याने डेक्कन पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द तक्रारी अर्ज करा. तुम्हाला त्रास दिल्याचे आठ दिवसांत पैसे काढून देतो. माझ्या पोलीस खात्यात मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत. मी आत्तापर्यंत ३२ अधिकारी निलंबीत केले असल्याचे फिर्यादींना सांगून उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द त्याने लेटरहेडवर अर्ज करण्यास भाग पाडले.
त्यानंतर आल्हाट याने फिर्यादींना घरी बोलावून सोनवणे अर्ज प्रकरणात ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली. मला पैसे दिले तरच तुम्ही सोनवणे व पालवे यांचे विरुध्द केलेले अर्ज मागे घेवून देईल असे सांगितले. मी सांगितल्याप्रमाणे वागला नाहीत तर तुम्हाला पण लटकवून टाकीन, जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. तसेच इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर दबाव टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आल्हाट याला अटक केली आहे.