पिंपरी : बीड येथे पूर्ववैमनस्यातून खून करून पळालेल्या आरोपीस वाकड पोलिसांनी सापळा लावून अटक केली.
सुरज उर्फ गांधी भागीरथ मिश्रा (रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या आई आणि वडिलांसोबत मिळून एका व्यक्तीचा खून केला. त्यानंतर तो बीड येथून पुनावळे गावठाण येथे त्याच्या बहिणीकडे आला असता त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यातील सराईत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ते आरोपी पोलिसांना ‘आरोपी दत्तक योजनें’तर्गत दत्तक देण्यात आले आहेत. बुधवारी (दि. 29) वाकड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक दत्तप्रसाद चौधरी यांना त्यांच्याकडे दत्तक असलेल्या आरोपीने त्यांना माहिती दिली की, सुरज उर्फ गांधी भागीरथ मिश्रा हा बीड येथे खून करून पुनावळे येथे त्याच्या बहिणीकडे पळून आला आहे.’
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सूरज उर्फ गांधी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बीड येथील गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बीड येथील दत्त मंदिर गल्ली येथे आरोपी सुरज उर्फ गांधी भागीरथ मिश्रा, त्याचे वडील भागीरथ रामकृष्णा मिश्रा, आई जयश्री भागीरथ मिश्रा यांनी मिळून मुस्तफा शिकलकर (रा. चुना गल्ली, बीड) यांचा मारहाण करून खून केला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील, पोलीस उप निरीक्षक गणेश तोरगल, पोलीस अंमलदार, दत्तप्रसाद चौधरी, दिपक साबळे, अतिश जाधव, कल्पेश पाटील यांनी केली आहे.