पिंपरी : खोदकाम करताना मिळालेला तीन किलो वजनाचा सोन्याचा हार हिंजवडी येथे एका महिलेला विकताना हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सोनू मिठा राठोड (39, रा. दिवा ईस्ट, ठाणे), जितेन धर्मा मारवाडी (25, रा. मुलुंड पूर्व, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रितेश कोळी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनू आणि जितेन यांना नाशिक येथे खोदकाम करताना तीन किलो वजनाचा सोन्याचा हार मिळाला. तो हार वाकड येथील एका महिलेला आरोपींनी विकण्यासाठी संपर्क केला. तो हार 60 लाख रुपयांना विकण्याचे ठरले. दरम्यान महिलेने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी महिलेच्या सोसायटी परिसरात सापळा लावला.
बुधवारी (दि. 29) रात्री साडेआठ वाजता आरोपी दोघेजण महिलेच्या घरी हार घेऊन विकण्यासाठी आले. पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी फिर्यादी पोलीस नाईक कोळी यांना धक्काबुक्की केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे तपास करीत आहेत.