पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात खुलेआम सुरू असलेल्या H2O नावाच्या या हुक्का पार्लरवर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः जाऊन छापा टाकला. हर्बल हुक्का पार्लरच्या नावावर अवैध पद्धतीने हा अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती कृष्ण प्रकाश यांना मिळाली होती. अखेर थर्टी फस्टच्या दिवशी कृष्ण प्रकाश आणि सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारुन बऱ्याच प्रमाणात हुक्का आणि इतर वस्तू जप्त केल्या.
हर्बल हुक्का पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या या पार्लरमध्ये अनेक ग्राहक तंबाखूयुक्त हुक्क्याच्या स्वाद घेत असतानाच आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपल्या टीमसह इथे छापा मारला. यावेळी हजारो रुपयांचे तंबाखूयुक्त फ्लेवर्स व हुक्का पॉट ही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले. पहाटे उशिरापर्यंत ही कारवाई अशीच सुरू होती.
‘हायकोर्टाच्या आदेशाचा विपर्यास करुन हे लोकं हुक्का पार्लर चालवतात. कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, आदेशाचं पालन करुनच फक्त हर्बल हुक्का पार्लर चालवू शकतात. यामध्ये ज्या आवश्यक अटी आणि शर्थी आहेत त्या हे लोकं पाळत नाही. हॉटेल्सला परवानगीशिवाय ओपन टेरेसमध्ये यांना दारुची विक्री करता येत नाही. त्यांना फायर एनओसी आवश्यक आहे. त्यांचे ऑडिट होणं आवश्यक आहे. पण यापैकी कोणत्याही नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही.’
‘याबाबत जेव्हा आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही आमची काही माणसं पाठवून याची खात्री करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा या हॉटेलमध्ये आमच्या माणसांनी तंबाखू हुक्क्याची मागणी केली तेव्हा त्यांनी लागलीच तंबाखू हुक्का आणून दिला आणि सांगितलं की, हा तंबाखूवाला हुक्का आहे.’
‘एवढ्या रात्री कोणी हर्बल हुक्का घेण्यासाठी येणार नाही. हे स्पष्ट आहे. कारण हर्बल हुक्कामध्ये जागरण करुन देण्याची क्षमता नाही. जर तुम्हाला किक देण्याची क्षमता नाही. हर्बल हुक्का हा फक्त एंटरटेनमेंटसाठी असतो. पण इथे एवढ्या रात्री हे लोकं इथं हर्बल हुक्काच्या नावाखाली तंबाखू हुक्का विकत होते.’
‘हॉटेल चालक अतिशय चालाखीने हर्बल हुक्क्याच्या कंपनीच्या नावाखाली तंबाखू हुक्काची विक्री करत होते. असं स्पष्टपणे दिसून येत आहे. आमच्या लोकांना त्यांनी तशाच पद्धतीने हुक्का दिला होता.’
‘आता ताब्यात घेतलेल्या वस्तू आम्ही तपासणी देखील पाठविणार आहोत. आपण इथे पाहू शकता की, इथे हुक्का तर आहेच पण दारु देखील पुरवली जात होती. ते देखील ओपन टॅरेसमध्ये. त्यामुळे आता संबंधितांवर योग्य कलमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.’
‘आमच्या हद्दीत अशा प्रकारे जर कोणी हुक्क्याची विक्री करत असेल तर आम्ही ते बंद करणार. जर हर्बल हुक्क्याच्या नावाने जर कोणी अवैधपणे हुक्का विक्री करत असेल तर ते मी चालू देणार नाही.’ अशी माहिती कृष्णप्रकाश यांनी दिली आहे. हि कामगिरी सामाजिक सुरक्षा पथकाचे निरीक्षक देवेंद्र चव्हाण, एपीआय अशोक डोंगरे आणि टीमने केली आहे.