पोलीस आयुक्त ‘स्पॉट’वर जातात यात गैर काय ? : वळसे-पाटील
चाकण गोळीबार प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
पुणे : चाकण येथे घडलेल्या आरोपी आणि
पोलीस यांच्यातील चकमकीमुळे अनेक प्रकारच्या चर्चेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आले आहेत. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी चक्क आरोपींवर झाड फेकलं आणि आरोपी ताब्यात घेण्यात आले असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते..
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, चाकण येथे जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल मी स्वतः माहिती घेतली असून ही घटना खरोखरच घडली आहे. पोलीस आणि आरोपींमध्ये त्या ठिकाणी संघर्ष झाला असून पोलीस आयुक्त इतर अधिकार्यांसमवेत स्पॉटवर गेले होते. ते जर स्पॉटवर गेले असतील तर यामध्ये गैर काय? यामध्ये काहीही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. तर पोलीस आयुक्तांनी खरोखरच झाड फेकून मारलं की नाही याबाबत माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड परिसरात गोळीबार करून फरार झालेले काही आरोपी चाकण परिसरात लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी गेले होते. स्वतः पोलिस आयुक्त या पथकाचे नेतृत्व करत होते. परंतु पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. यावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पळून जाणाऱ्या आरोपींच्या दिशेने झाड फेकले आणि त्यानंतर आरोपी खाली पडले. त्यानंतर इतर पोलिसांनी आरोपींना पकडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
परंतु पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश स्वतः या कारवाईमध्ये का सहभागी झाले होते ? त्यांनी आरोपींच्या दिशेनं खरंच झाड फेकून मारलं का ? की हा केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट होता असे प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित करण्यात आले होते? त्यानंतर आता स्वतःच गृहमंत्र्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.