नवी दिल्ली : भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. अगदी पंतप्रधान मोदींपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत संपूर्ण देशवासीयांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली होती. परंतु, अति महत्त्वाच्या पदावर असलेल्या बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कशामुळे क्रॅश झाले, याचा तपास करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात मोठा खुलासा झाले असून मोठे आणि महत्त्वाचे कारण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह समितीने या घटनेची संपूर्ण चौकशी केली आहे. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे समितीच्या चौकशीतून समोर आल्याचे सांगितले जात आहे.
वायुसेनेच्या वतीने या अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कराणांचा तपास करत असलेल्या समितीने अहवालात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे वैमानिक विचलित झाले असावे, यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच Controlled Flight Into Terrain असे म्हटले जाते, असे सांगितले जात आहे.
हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सीडीएस जनरल बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन येथे एका कार्यमासाठी जात असताना 8 डिसेंबर रोजी भारतीय हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये बिपीन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला होता.
वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हा अपघात झाला. दोन इंजिन असलेले IAF MI-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जाते. परंतु हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली. हे हेलिकॉप्टर सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे मुख्यत्वे वापरले जाते.