दरोडा, खंडणीच्या गुन्ह्यात फरार सराईत गुन्हेगार अटकेत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गुंडा विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानात घुसून, हत्यारांचा धाक दाखवत, दरोडा टाकून फरार असणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. यातील एकावर गंभीर स्वरूपाचे तब्बल 13 गुन्हे दाखल आहेत.
देवानंद उर्फ देवा भीमाशंकर जमादार (24, रा. किवळे, देहूरोड) आणि सॅमसन उर्फ छोट्या झेवीयर (29, रा. देहूरोड) या दोघांना अटक केली आहे. जमादार आणि झेवीयर या दोघांनी देहूरोड येथील दुकानात घुसून, पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. तेंव्हापासून दोघे फरार होते.
या दोघांची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक हरीश माने यांना मिळाली. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी अक्कलकोट येथे जाऊन, सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आणि देहूरोड पोलिसांकडे सुपूर्त केले.
जमादार याच्या विरुद्ध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड, तळेगाव, हिंजवडी, वाकड, चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, दरोडा, मारहाण, खुनी हल्ला, विनयभंग, दहशत माजवणे, आर्म ऍक्ट आदी प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत.