लखनऊ : लखनऊ घराण्याशी संबंध असलेले प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांचे खरे नाव बृज मोहन मिश्रा होते.
लखनऊमध्ये ४ फेब्रुवारी १९३८ मध्ये त्यांचा जन्म झाला. पंडीत बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर, गायक आणि संगीतकार होते. त्याचबरोबर ते वाद्य वाजवायचे, कविता लिहायचे तसेच ते चित्र सुद्धा रेखाटत होते. त्यांचे जगभरात अनेक शिष्य सुप्रसिद्ध कलाकार आहे.
पंडीत बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड च्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी नृत्यदिग्दर्शनही केले. ज्यामध्ये उमराव जान, देढ इश्किया, बाजीराव मस्तानी या चित्रपटांचा समावेश आहे.
विश्वरूपम चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी २०१२मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान देखील पंडीत बिरजू महाराज यांना मिळाला आहे.