पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी मेट्रो कामाची अचानक पाहणी केली. नियोजित दौरा नसताना त्यांनी सकाळी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा संपूर्ण आढावा जाणून घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचे काम कुठपर्यंत पोहचले? उरलेले काम कधीपर्यंत पूर्ण होईल? कामात काही अडचण येत आहे का? मेट्रोच्या कामासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आदी माहिती या अधिकाऱ्यांकडून पवार यांनी जाणून घेतली.
यावेळी पवार यांनी फुगेवाडी ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. तसेच अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे मेट्रोच्या डब्यात गर्दी झाली होती. पवारांनी मेट्रोतून उभ्यानेच प्रवास केला. या प्रवासातही त्यांनी अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती जाणून घेतली.
मेट्रोचा प्रस्ताव आघाडी सरकारच्या काळात पाठवण्यात आला होता, युतीच्या सरकारच्या काळात मेट्रोचे काही काम झाले आणि आता नामदार अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा वेगाने मेट्रोचे काम झाले आणि आज प्रत्यक्षात ती मेट्रो धावतांना पुणेकरांना व पिंपरी चिंचवडकरांना आनंद होत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अंकुश काकडे, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे आदी उपस्थित होते.